आपल्या भावंडांना पालकांसमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटांवरून विहरण्याची आणि मासा पकडण्यासाठी सूर मारायची कला शिकताना पाहिले होते. एवढेच नव्हे, तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिलावहिला हेरिंग मासा पकडून गट्टम करताना आणि पालकांना त्याच्याभोवती गोल फिरून कलकल आवाज करीत त्याला शाबासकी देतानाही पाहिले होते. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करीत होते.
सूर्य जसजसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला. त्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली कारण आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते.
हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभे राहून, दुसरा पाय आपल्या पंखांखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे सोंग घेतले. तरीदेखील घरच्यांपैकी कुणी त्याची दखल घेतली नाही, त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोके मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती आणि त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. त्याच्या आईचे फक्त त्याच्याकडे लक्ष होते.
पठारावरच्या एका उंचवट्यावर आपली पांढरेशुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. पुन्हापुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. ते अन्न पाहून तो खुळावला. अशा प्रकारे अन्न फाडून, चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत असे.
"गा, गा, गा," त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली.
"वाव-कॉल-आह," ती उपहासाने ओरडली. पण तो परत परत तिला विनवू लागला आणि मिनिटभरात आनंदाने त्याने चीत्कार केला. माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघालो होती. ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना... ती तशीच थांबली, तिचे पंखही स्तब्ध झाले. तो जवळ का येत नाही याचे आश्चर्य वाटून तोही क्षणभर घुटमळला आणि मग, भुकेने व्याकूळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली मोठ्याने चीत्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला. क्षणभर तो सुन्न झाला. पण पुढच्याच क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. त्याच्या छातीवरील पिसांमध्ये, पोटाखाली आणि
त्याच्या पंखांखाली वारे भरले आहे. त्याच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. मात्र आता त्याचा कपाळमोक्ष होणार नव्हता. तो हळूहळू हवेत तरंगू लागला.
त्याला भीती वाटत नव्हती. फक्त किंचित भोवळ आल्यासारखे वाटत होते. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. "गा, गा, गा, गा, गा, गा, गाव-कॉल-आहे,"
पंखांचा फडफडाट करोत आई त्याच्याकडे झेपावली. त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिला. त्याचे वडील कलकलाट करीत त्याच्याभोवती घिरट्या घालू लागले. दोघे भाऊ आणि बहिणीनेही त्याच्यापाशी झेप घेतली आणि डौलदार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहरू लागले.
आपल्याला उडता येत नव्हते, हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वत:वर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळी देऊ लागला.
तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत, सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चीत्कार केला.
त्याचे आई वडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरले. कलकल आवाज करीत ती त्याला खुणा करून बोलावू लागली. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला. पण त्याचे पाय आत बुडू लागले. तो घावरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला, मात्र आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडताही येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. आता तो छानपैकी तरंगू लागला. त्याचे कुटुंबीय त्याच्याभोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉग फिश / माशाचे तुकडे भरवू लागले.
अशी घेतली त्याने आपली पहिलो भरारी!
No comments:
Post a Comment